पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे सर्वात प्रतिष्ठीत गणपती मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराच्या दारातच सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय असल्याचं समोर आलं आहे. दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या महिलेच्या मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याप्रकरणी
पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या लहान मुलीला घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरात दर्शनासाठी आली होती. मंदिरात जाण्यासाठी त्या रांगेत उभ्या असताना दोन्ही आरोपी महिलांनी भक्त असल्याचं भासवत मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. या साखळीची किंमत 40 हजार आहे. मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचं लक्षात येताच महिलेने मदत मागत आरडाओरड सुरु केली. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली असून त्या आरोपींची ओळख पटवली आहे. माधुरी संतोष डुकळे (घाडगे) (वय 23) आणि काव्या तनवीर जाधव (वय 21) अशी त्या आरोपी महिलांची नावे आहेत.
दरम्यान या दोघीही महिला पुण्यातील यवत गावच्या रहिवासी आहेत. तक्रारदार महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार दोन्ही महिलांना कलम 303 (2) अंतर्गत अटक करण्यात आली आहे .