लोणी काळभोर : पुरंदर किल्ला ते श्री क्षेत्र तुळापूर-वढू बुद्रुकपर्यंत आयोजीत करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळा कदमवाकवस्ती हद्दीत पोहोचताच धर्मवीर संभाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत शिवप्रेमी व तरुणांकडून फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. यावेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, निलेश काळभोर, प्रतिक काळभोर, कमलेश काळभोर, संतोष भोसले, मारुती काळभोर, गोरख मोरे, परिसरातील अनके तरूण, महिला भगिनी या पालखी सोहळ्यात दाखल झाले होते.
रेनबो स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी दोन अश्वासहित पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. कदमवाकवस्ती येथून पालखी सोहळा पारंपारिक पद्धतीने घोषणा देत टाळ मृदुंगाच्या साथीने वाजत गाजत पुढे निघाला. यावेळी लोणी स्टेशन येथे नंदू काळभोर व मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश काळभोर व त्यांच्या मित्रपरिवाराकडून स्वागत करण्यात आले व पालखी पुणे – सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर हद्दीत सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोहोचली.
पालखी सोहळा लोणी काळभोर हद्दीत पोहोचताच, माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, माजी सरपंच योगेश काळभोर, सदस्य राहुल काळभोर, नागेश काळभोर, सतीश काळभोर, युवराज काळभोर, अमित काळभोर, संगीता काळभोर, युवक, युवती व बचतगटाच्या महिला वर्गाने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखीची ग्रामप्रदक्षणा काढण्यात आली. भक्ती-शक्ती शिल्पाला पै. संदीप भोंडवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याहस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याची आरती केली. तसेच पोलीस प्रशासनाने पालखी सोहळ्यादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. पै. आदित्य काळभोर याचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ह.भ.प. बांगर महाराज यांचे अंबरनाथ मंदिरात प्रवचन झाले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला.
दीड हजार भाकरी, शेंगदाण्याची चटणीचा महाप्रसाद..
पालखी सोहळ्याबरोबर चालत आलेल्या तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील उपस्थित असलेल्या सुमारे 700 ते 800 नागरिकांना परिसरातील महिला भगिनींनी 1500 भाकरी व शेंगदाण्याची चटणी, भाजी बनवून आणली होती. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी या बेताचा मनसोक्त आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 28) सकाळी थेऊर फाट्यापर्यंत ग्रामस्थ पालखीला पुढील मार्गासाठी मार्गस्त करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे ध्येय व उद्दिष्ट छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणे, शिवचरित्राचा प्रसार करणे, संभाजी महाराजांचे पराक्रम, महाराजांनी राबवलेल्या विविध योजना अशी अनेक प्रकारची माहिती यावेळी देण्यात येत आहे. 2015 पासून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून प्रथमच लोणी काळभोर येथे मुक्कामी थांबला आहे. यावर्षी पालखी सोहळ्याचे 11 वे वर्षे आहे.
दरम्यान, धर्मवीर संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर येथून श्रीक्षेत्र तुळापूर येथील वढु बुद्रुक पर्यंतचा पायी पालखी सोहळा बुधवारी (ता. 26) ते शनिवारी (ता. 29) दरम्यान होत आहे. सदर पालखी सोहळ्याचे किल्ले पुरंदर पासून गावागावात स्वागत होत असून विविध सामाजिक उपक्रम घेऊन अनेक शंभूभक्त व शिवभक्त देखील सामील होत आहेत.