बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली होती. या हत्या प्रकरणाला 140 पेक्षा अधिक दिवस होऊन गेले आहेत तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर घेण्यात आली.मात्र न्यायाधीश पाटोदकर हे रजेवर असल्यामुळे हे प्रकरण विशेष न्यायाधीश शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आले. सुनावणी घेत न्यायाधीश शिंदे यांनी या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी १९ मे हि तारीख दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होणार होती. मात्र विशेष न्यायाधीश पाटोदकर हे रजेवर असल्यामुळे हे प्रकरण तात्पुरते न्यायाधीश शिंदे यांच्या कोर्टात सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र आजच्या दिवशी सुनावणी न होताच न्यायाधीश शिंदे यांनी देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीसाठी १९ मे ही तारीख देण्यात आली आहे.
दरम्यान आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हे देखील गैरहजर होते. त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पहिले. मात्र सुनावणीसाठी आरोपी वाल्मीक कराडचे वकील विकास खाडेकर हे देखील गैरहजर होते. तर आरोपी विष्णू चाटेचे वकील न्यायालयात हजर आहेत.
दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.