पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात अनेक नवनवीन आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांना चांगलाच दणका बसला आहे. ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचेही वैद्यकीय परवाने निलंबित केले असून त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर हे दोघेही सध्या कारागृहात असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत दोघांचेही परवाने निलंबित राहणार आहेत. त्यामुळे दोघांनाही निकाल लागेपर्यंत वैद्यकीय सेवेत काम करता येणार नसल्याच एमएमसीने स्पष्ट केल आहे.राज्यातील डॉक्टरांची नोंदणी परिषदेकडे असते. या नोंदणीनुसारच डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करता येतो. आता या दोघांचीही नोंदणी रद्द करण्यात आल्याने त्यांना वैद्यकीय सेवा करता येणार नाही.
गेल्या वर्षी १९ मे रोजी कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे मोटार चालविणाऱ्या अल्पवयीन युवकाने दुचाकीस्वार अभियंता आणि त्याच्या मैत्रिणीस धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन युवकाची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली. मात्र, आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले. आता याप्रकरणी डॉ. तावरे आणि आपत्कालीन विभागातील तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाळनोर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.