शिरूर : वाहनाचे हप्ते थकले असल्याचे सांगून नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून आलेल्या 4 ते 5 अनोळखी इसमांनी टोयोटा रुमियन कार अडवून चालकाच्या कारची चावी काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिरूर येथे घडली. या प्रकारामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.17 ) दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शिरूर शहराजवळील सतरा कमान पुलाजवळ, अहिल्यानगर ते पुणे रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी नियाज अब्दुल सकूर राईन हे त्यांच्या ताब्यातील टोयोटा रुमियन कारने अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आणि नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधील चार ते पाच अनोळखी इसमांनी शिरूर येथील घोड नदीवरील सतरा कमानी पुलापासून नियाज यांच्या कारचा धोकादायक पद्धतीने पाठलाग केला. त्यानंतर फलकेमळा चौकाजवळ बलेनो कारमधील इसमांनी नियाज यांची कार, विना नंबरची बलेनो कार आडवी लावून, यावेळी बलेनो कार मधील अज्ञात इसमांनी ‘तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत,’ असे सांगून कार थांबविण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर बलेनो कारमधील इसमांनी टोयोटा रुमियनजवळ येत तिची चावी काढण्याचाही प्रयत्न केला. यावेळी कारमध्ये प्रवासी असलेल्या ॲड. उज्ज्वला पवार यांनी संबंधित इसमांना पाठीमागून पोलीस येत असल्याचे सांगितले. त्यानंतर बलेनो कार मधून आलेले सर्वजण बलेनो कारमध्ये बसले आणि यू-टर्न घेऊन अहिल्यानगरच्या दिशेने निघून गेले.

या प्रकरणी नियाज राईन यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
नंबर प्लेट नसलेल्या कारचा वापर; पोलिसांकडून तपास सुरू
वाहनाचे हप्ते थकले असल्याचे कारण पुढे करून भररस्त्यात वाहन अडविणे आणि त्याची चावी काढण्याचा प्रयत्न करणे, या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित इसम नेमके कोण होते, ते कोणाच्या सांगण्यावरून आले होते आणि त्यांचा वाहन अडविण्यामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबंधितांची ओळख पटवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.






