Chhattisgarh Accident : छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात मोठा अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत नववधू-नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.(Truck-Car Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून परतत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली होती. नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रामगड आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं.(Accident News)
नेमकं काय घडलं?
हे सर्वजण एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पकारिया जंगलातील चंडीदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या धडकेचा आवाज ऐकून स्थानिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण
वधू-वरांच्या अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण लागलं आहे. जिथे कालपर्यंत सनई-चौघडे वाजत होते, आता तिथे शांतता पसरली आहे. बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं शनिवारी रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. यावेळीच त्यांच्यावर काळाने घाला घातला