पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे -चाकण-शिक्रापूर एन एच 548 डी या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या महामार्गाला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तळेगाव ते चाकण दरम्यानचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी तळेगाव -चाकण -शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबी प्रस्तावित चार पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर अखेर या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी, कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित होता. ज्याला 23 एप्रिल रोजी मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून याचे काम बीओटी तत्वावर केले जाणार आहे.
या मार्गामुळे अनेक ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच परिसरातील औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे.या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मावळ, खेडसह शिरुर तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
मावळ,खेड,शिरूर तालुक्यातील नागरिकांना होणार फायदा-
1. या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत होईल
2. उद्योग आणि गुंतवणूक वाढीस लागेल.
3. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
4. प्रवास अधिक सुरक्षित होईल.