शहापूर : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून तरुणाने व्हिडीओ तयार केला होता. परंतु असं कारण त्यांच्या अंगलट आले आहे. समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी चित्रफित तयार करणाऱ्या नाशिक येथील दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजा हिम्मत येरवाल (वय २०), रितेश हिरालाल जाधव (वय १८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत. दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून राजा आणि रितेश यांनी एक चित्रफित तयार केली होती.
या चित्रफितीमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत असल्याचे दिसून आले. ही चित्रफित या तरूणांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून चित्रफित तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या चित्रफितीच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता.
रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीद्वारे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजताच रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत दोन्ही तरूणांना नाशिकमधून अटक केली आहे.