पुणे : स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेल्याच्या घटनेने पुण्यासह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे यांच्याविरोधात 893 पानांचे दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोषारोपपत्रात घटनेचा तपशीलवार आढावा, 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर तब्बल 52 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.
तपासातील ठळक मुद्दे
1. घटनास्थळावर दोघांचे केस व आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
2. आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून असल्याचे दिसत होता, तसेच तो पीडितेशी बोलत होता, पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बोलताना पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
3. आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
4. पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाव न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
5. स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
6. आरोपीच्या मोबाइल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.
7.ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये गुगल सर्च, आरोपीचे लोकेशन, शिवशाही बसमधील तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यातून आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्यात आले आहेत