पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगेसोय-यांचा अध्यादेश तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेले उपोषण आज बुधवारी (दि.24) रोजी दुपारी 12 वाजता सोडणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोय-याच्या अधिसुचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल रात्री 23 जुलै रोजी मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे, त्यांनी उपचार घेतले आहेत. आणि आज सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, समाज माझ्यासमोर हट्ट करतयं. तुम्ही असाल तरचं समाजाची एकजूट राहील अशी समाजाची भावना आहे. रात्री विनंती केल्याने मी सलाईन लावलं. मी कितीही विरोध केला तरी त्यांनी मला सलाईन घेण्यास लावलं. पण, अशा पद्धतीने उपोषण काही कामाचं नाही. आता एक दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरु करणार आहे. सलाईन लावून उपोषण करण्यास मी तयार नाही. मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत जरांगेंनी म्हटलं आहे.