पुणे: काही दिवसांपूर्वीच भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी बारामती मतदारसंघातून भाजपात प्रवेश केला आहे . त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आता बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची राजकीय कोंडी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा डाव टाकला असून बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही आमदार सध्या नाही. एवढंच नाही मविआच्या मित्रपक्षांचाही या मतदारसंघात आमदार नाही. भाजपचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार मतदारसंघात आहे. त्यातच जनाधार असलेला काँग्रेसचे जे नेते संग्राम थोपटे होते, ते आता भाजपात गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय फटका कितपत सुप्रिया सुळेंना बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. त्यामुळे बारामतीचा गड सुप्रिया सुळेंसाठी अवघड झाल्याची चर्चा सुरु आहे. संग्राम थोपटे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सुप्रिया सुळे यांची ताकद कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.