पुणे : दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या दिल्या जात होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मे नंतर शैक्षणिक सुट्या लागत होत्या. मात्र यंदा पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. परंतु, त्यानंतर अर्थात एप्रिलच्या उत्तरार्धात मूल्यमापन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत शाळेत यावे लागणार आहे. परिणामी सुट्टयांचा कालावधी सुमारे १५ दिवसांनी कमी झाला आहे. याबाबत शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व शाळांना आदेश दिले आहेत.
यावर्षी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २ तसेच नियतकालिक मूल्यांकन अर्थात पीएटी चाचण्या ८ ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तसे सुट्टयांच्या कपातीचे परिपत्रक आणि परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. सर्वच शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, आता शिक्षण विभागाच्या या नियोजनावर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनेला अनुसरून २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, आता एप्रिलमध्ये कडक उन्हाळा असताना विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी रद्द करत शाळेत ‘यावे लागणार आहे. पालकांचे देखील सुट्टी कालावधीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे.