कर्नाटक : कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कर्नाटकातील तुमकूर शहरात एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवल्याची खळबळजनक घटना आहे. या घटनेत पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. कर्जबाजारीपणा आणि त्यातून झालेला छळ यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.
यासंदर्भात कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून, एक व्हिडीओही तयार केला आहे. या चिट्ठीत कर्जबाजारीपणा आणि त्यातून झालेला छळ, असं लिहिलं आहे. या कारणामुळे कुटुंबाने जीवन संपवलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचजणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गरीब साब, त्यांची पत्नी सुमैया, मुलगी हाजिरा आणि मुलगा मोहम्मद शाभान आणि मोहम्मद मुनीर अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण तुमकूर शहरातील एका इमारतीत राहत होते.