लोणी काळभोर – भारत देशाला महापुरुषांची मोठी परंपरा असून या महापुरुषांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आगामी काळात वाटचाल करावी. असे मत बँक ऑफ बडोदा कुंजीरवाडी शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
धुमाळमळा (कुंजीरवाडी, ता. हवेली ) येथील मुक्ताई मेमोरिअल शाळेमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना वरील मत वैभव पाटील यांनी मांडले. यावेळी समाधान वाघ, मुक्ताई मेमोरिअल शाळेचे संस्थापक महेंद्र धुमाळ, विकास धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा गांधी जयंती निमित्त बडोदा बॅन्केच्या माध्यमातून मुक्ताई मेमोरिअल शाळेमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका मनिषा यादव यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेनका वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना मोथारकर यांनी केले.