उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घरगुती वादातून चिडलेल्या जावयाने सासू व पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सासूच्या हाताला मोठी जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (ता. 21) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना शिंदवणे हद्दीत घडली आहे.
प्रमोद बाळासाहेब आमले (वय- 32, रा. टेकवडी, ता. पुरंदर,) असे मारहाण केलेल्या जावयाचे नाव आहे. तर संगीता मच्छिंद्र महाडीक (वय- 45, रा. शिंदवणे, ता. हवेली) असे वार झालेल्या सासूचे नाव आहे. प्रियांका प्रमोद आमले (वय-32 )असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दोघींना दगड, वीट व कोयत्याने आमले याने मारहाण केली आहे. दोघींनाहि कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम यांच्या रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद आमले व प्रियांका आमले यांचा विवाह झाला होता. तरी मागील काही दिवसांपासून पत्नी प्रियांका हि नांदत नव्हती. आज सोमवारी दुपारी जावई प्रमोद हा येतानाच पिशवीत कोयता घेऊन आला होता. यावेळी घरी आला असता सासू, पत्नी या तिघांमध्ये घरगुती वादातून भांडणे सुरु झाली.
दरम्यान, यावेळी जावई प्रमोद आमले याने शेजारी पडलेल्या दगड, वीटेने सासू व पत्नीला मारहाण सुरु केली. तसेच यावेळी पिशवीत आणलेला कोयता बाहेर काढून त्याने सासूवर हल्ला केला. यावेळी सासूने वार हवेत झेलताना त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली. या घटनेत सासूला गंभीर दुखापत झाली असून असून दोघींवर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु आहेत.