Solapur News: सोलापूर : सोलापूरच्या बार्शीमध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संतोष गिरीगोसावी यांना चांगले पद असूनही मुलाचा हव्यास सुटला नाही. आधीच दोन मुली असूनही त्यांना २००५ नंतर तिसरे मूल झाले. मुलासाठी त्यांनी 2005च्या नियमाचे उल्लंघन केले. त्यानंतर त्यांनी नोकरी वाचविण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची मुलगी दत्तक दिली. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ चे उल्लंघन केल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
संतोष गिरीगोसावी हे महाराष्ट्र पोलिस विभागात १९९८ पासून कार्यरत आहेत. त्यांना पहिली मुलगी नयन (१९९६), द्वितीय मुलगी संस्कृती (१९९९) आहे. २०१० मध्ये त्यांना मुलगा अर्जुन हे तिसरे अपत्य झाले. मुलगा हवा म्हणून त्यांनी असे केल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते काटकर यांनी ॲड. तृणाल टोणपे यांच्यामार्फत त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
लवकरच या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता आहे. यात काटकर यांच्याकडून ॲड. अनिरुद्ध रोटे, ॲड. निकिता आनंदाचे, ॲड. आशुतोष शिंदे, ॲड. सिद्धी जागडे, पूजा तुपेरे हेही काम पाहत आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ च्या कलम तीननुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास कायद्यानुसार ते अमान्य आहे. पोलिस निरीक्षक गिरीगोसावी यांना २००५ नंतर तिसरे मूल झाले आहे. त्यापैकी त्यांनी संस्कृती गिरीगोसावी या पाल्याचा त्याग करून ते दत्तक दिल्याचं सांगितले आहे. अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी मुलाच्या हव्यासापोटी दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील आणि दत्तक दिल्याचे सांगतील, हे कायद्याला मान्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी करून कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.