सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरला असुन प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे आज रविवारी ता.२५) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एक दरवाजा उघडण्यात आला आहे. आणि त्यातून ३०० क्युसेकसने पाण्याचा विसर्ग सीना नदी पात्रात करण्यात आला आहे.
परंडा तालुक्यातील खासापुरी, चांदणी मध्यम प्रकल्प तसेच निम्नखैरी पांढरेवाडी बृहत लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. साकत मध्यम प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहे. सीना कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे रविवारी दुपारी प्रकल्पाचा ८ क्रमांकाचा एक दरवाजा ५ सेंटीमीटर उघडण्यात आला आहे. आणि त्यातून ३०० क्युसेक्स पाणी सीना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
सिना, नळी व खैरी या तीन नद्यांचा संगम धरण क्षेत्रातील डोंजा परिसरात होतो. नगर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यामुळे त्या भागातील प्रकल्प ओहरफ्लो झाले. हे वाहुन जाणारे पाणी तिन्ही नद्यात येते. त्यामुळे या नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. सीना नदीतील पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पात आल्याने प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षीही पुर्ण क्षमतेने भरला आहे. तर रोसा, मुंगशी, आवाटी, भोत्रा आदी गावासह सीना नदी काठच्या तसेच शेतवस्ती येथील नागरीकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सिना कोळेगाव प्रकल्प प्रभारी कार्यकारी अभियंता एस.एम.मस्तुद, उपविभागिय अभियंता अमित शिंदे, उपविभागिय अधिकारी बी.आर. कांबळे, सहाय्यक अभियंता अभयसिंह पाटील,एस.एस. सोनुने, आतार,गौंडरे येथील सरपंच सुभाष हनपुडे उपस्थित होते.