नाशिक: नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे जुन्या वादातून टोळक्याने 27 वर्षीय तरूणाची घरात घुसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रवीण कांडाळकर (वय 27वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिन्नरच्या वावी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक माहितीनुसार, प्रवीण कांडळकर हा त्याच्या घरी असताना जुन्या वादातून टोळक्याने घराचे दरवाजे तोडून कोयता, कुऱ्हाड, तलवारने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कांडाळकरचा मृत्यू झाला. हत्या करून हल्लेखोर पसार झाले होते. या संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या पूर्व वैमन्यस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आपल्या जीवाला धोका असल्याचा संशय त्याला असल्याने त्याने या टोळक्याच्या विरोधात वावी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने न घेतल्यामुळे ही हत्या झाली असल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.