पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पुण्यासह सोलापूर,कोल्हापूर आणि नागपूरमध्ये जीबीएस आजाराने थैमान घातले होते. या गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव कोंबड्यांद्वारे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधनातून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जीबीएसच्या प्रादुर्भावानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कुक्कुटपालनातील कोंबड्यांची विष्ठा, रुग्णांचे रक्तनमुने आणि पाण्याची तपासणी केली.या कुक्कुटपालन केंद्रातील नमुन्यांमध्ये ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आढळून आल्याने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, याविषयी संशोधन सुरू असून, त्यातून उद्रेकाचे कारण समोर येईल, असे एनआयव्हीचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले.
दरम्यान या संशोधनावेळी काही नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर, तर काही नमुन्यांत नोरोव्हायरसचे निदान झाले आहे. तपासणीत काही रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये कॅम्पायलोबॅक्टर आढळून आला होता. त्यानंतर खडकवासला धरण परिसरातील कुक्कुटपालन केंद्रांमधील कोंबड्यांची विष्ठा तपासली. यामधील ३० ते ३५ टक्के नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर आढळून आला असल्याच समोर आल आहे