अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वस्तीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
येथे पहा व्हिडिओ
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आरोळे वस्ती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहात इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांनी मारहाण केली आहे.याप्रकरणी शाळा प्रशासनाने जामखेड पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीनं या घटनेची नोंद घेण्यात आली आहे .मारहाण झालेले विद्यार्थी आणि मारहाण करणारे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आठवीतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा सामाजिक पार्श्वभूमीचा अहवाल हा बाल न्यायमंडळाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकी मारहाण कोणत्या कारणामुळे झाली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.