शिरूर : पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. १) उघडकीस आली आहे. यामुळे रांजणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
ज्ञानदेव कोंडीबा खेडकर (वय ८०) व त्यांच्या पत्नी शेवंताबाई ज्ञानदेव खेडकर (वय ७५) असे निधन झालेल्या पतीपत्नीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव खेडकर हे एक निवृत्त पोलिस उपनिरीक्षक होते. खेडकर यांना हृदयविकाराचा “झटका आल्यामुळे पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. हे त्यांच्या पत्नी शेवंताबाई यांना समजताच त्या बेशुद्ध झाल्या. आणि त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, ज्ञानदेव खेडकर यांचे सोमवारी उपचारादरम्यान दवाखान्यात निधन झाले. पतीचे निधन झाल्याचे समजताच, पत्नी शेवंताबाईयांचाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खेडकर दांपत्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्ञानदेव खेडकर आणि शेवंताबाई खेडकर यांच्या पश्चात रोहिदास व गणेश ही दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू व रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर हे त्यांचे पुतणे होत.