(Shirur Crime News) शिरुर : करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरी झालेल्या जेसीबीचा शिरूर पोलिसांनी २४ तासाच्या आत छडा लावून (Shirur Crime News) तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कामगिरीबद्दल नागरीकांकडून शिरूर पोलिसांचे भरभरून कौतुक होत आहे.
अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी जितेंद्र संजय पठारे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे एक जेसीबी असून ते त्याच्या माध्यमातून विविध कामे करतात. करडे घाटाच्या वरील कंपनीतील खोदकामासाठी जेसीबी शुक्रवारी (ता.१७) आला होता. जेसीबीचे तेथील काम झाल्यानंतर जेसीबी करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या नविन झालेल्या पेट्रोल पंपावर लावला होता. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी संध्याकाळी जेसीबी चोरुन नेला.
त्यानंतर दिवशी जेसीबी मालक जितेंद्र पठारे हे पेट्रोल पंपावर आले असता, त्यांना जेसीबी त्या ठिकाणी मिळुन आला नाही. त्यानंतर पठारे यांनी तातडीने जेसीबी चोरी झाल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या होत्या.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी तांत्रिक माहीतीच्या आधारे शोध घेतला असता, सदर चोरीस गेलेला जेसीबी (नं एम एच १४ एच डब्लु ९९५६) हा चोरट्यांनी तांबा राजोरी (ता. पाटोदा जि. बीड) येथे दोन लाखाला विक्री केली आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी चोरीस गेलेला जेसीबी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, सदर जेसीबी चोरण्याकरीता कोल्हेवाडी गावातील सुभाष भगवान जगताप याने चोरी करुन आणुन दिले आहे. अशी चोरट्यांनी पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.
ही कामगिरी शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस नाईक नाथासाहेब जगताप, पोलीस अंमलदार विनोद काळे, रघूनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई आणि प्रविण पिठले यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड!