न्हावरे: शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील संभाजी, आलेगाव पागा आणि अजित सहकारी संस्थांच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आलेगाव पागा येथील तीनही विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या कामकाजाबाबत सभासद व शेतकऱ्यांनी गंभीर त्रुटी असल्याचे संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच अनेकदा भ्रष्टाचाराचे उघड आरोप करूनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.त्यामुळे सहकार विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आलेगाव पागा(ता.शिरूर)येथील संभाजी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीत सभासदत्व देण्यावरून आणि कर्जवाटपाच्या प्रकरणानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता.संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही संस्थांच्या एकूण कामकाजातील कथित अनियमितता आणि त्रुटींवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

‘गंभीर त्रुटी वारंवार समोर येऊनही कारवाई का नाही?’

शेतकरी बाळासाहेब वाघचौरे यांच्या म्हणण्यानुसार,आलेगाव पागा येथील तीनही सोसायट्यांच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांकडून यापूर्वीही विविध तक्रारी आणि आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. संस्थांच्या कामकाजातील काही गंभीर त्रुटीही अनेकदा समोर आल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करण्याऐवजी प्रकरणे पुढे ढकलली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“गंभीर आरोप आणि त्रुटी समोर येत असतानाही वरिष्ठ पातळीवरून ठोस कारवाई होत नसेल, तर सामान्य शेतकऱ्याने न्याय मागायचा कुणाकडे?” असा सवाल बाळासाहेब वाघचौरे यांनी उपस्थित केला आहे.
‘कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाराला अभय?’
संस्थांच्या कामकाजाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. “तक्रारी होतात,चौकशीचे आदेश होतात; मात्र, पुढे काय होते, हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाराला अप्रत्यक्षपणे अभय मिळत आहे का?” असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान,काही शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर संस्थांच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केले आहेत.गंभीर त्रुटी वारंवार समोर येऊनही कारवाई होत नसल्याने ‘भ्रष्टाचार सर्वमान्य झाला आहे’, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
तीनही सोसायट्यांची एकत्रित चौकशी होणार का?
आलेगाव पागा येथील तीनही विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. संस्थांचे ठराव, सभासद नोंदणी,कर्जमंजुरी व वाटप,सातबाऱ्यावरील बोजा नोंदी, आर्थिक व्यवहार,लेखापरीक्षण अहवाल तसेच तक्रारींवर झालेली कार्यवाही यांची तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
विशेषतः यापूर्वी गंभीर त्रुटी किंवा अनियमितता आढळल्या असतील, तर त्यावर काय कार्यवाही करण्यात आली.याची माहितीही सहकार विभागाने सार्वजनिक करावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सहकार विभाग आता तरी जागे होणार का?
एकीकडे शेतकरी संस्थांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे संबंधित यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही.याचा निष्पक्ष तपास होणे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणे आवश्यक आहे.
आलेगावच्या तीनही सोसायट्यांच्या कारभाराची एकत्रित चौकशी करून शेतकऱ्यांच्या आरोपांची सत्यता तपासली जाणार का? यापूर्वी आढळलेल्या कथित त्रुटींवर काय कारवाई झाली? आणि तक्रारी करूनही कारवाई झाली नसेल तर त्यासाठी जबाबदार कोण?
या प्रश्नांची उत्तरे सहकार विभागाने द्यावी.अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळणे अपेक्षित असताना त्यांच्याच तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण होत असेल,तर या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेणे गरजेचे आहे.







