पुणे : पुण्यातील लोहगाव भागात डेंगीमुळे 8 वर्षांच्या एका चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यावर्षी शहरातील डेंगीमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू असून, यामुळे पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला सलग चार ते पाच दिवसांपासून ताप आणि पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिच्यावर स्थानिक डॉक्टरांकडे आणि लोहगावच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 24 तासांनंतरही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब अचानक कमी झाल्याने तातडीने रुबी हॉल क्लिनिकमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या 50 हजारांपर्यंत घसरल्याचे निष्पन्न झाले. डेंगीची लागण तीव्र झाल्याने तिला ‘डेंगी शॉक सिंड्रोम’ झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उपचारादरम्यान तिच्या शरीरातील यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे कार्य बिघडले. अखेर रविवारी रात्री 8 वाजता तिला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत उदावंत यांनी सांगितले की, डेंगीचे निदान उशिरा झाल्यामुळे किंवा तापाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुंतागुंत वाढू शकते. पालकांनी डेंगीची लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेण्याचे आणि योग्य वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. शहरात डेंगीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे







