मुंबई : अंबरनाथमधील 23 वर्षीय फिजियोथेरपीच्या विद्यार्थिनीने कल्याण-शिक महामार्गावरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसी गावकर असे मृत मुलीचे नाव असून, ती डोंबिवली जवळील गोळवली गावातील ‘वीर लॉज’मध्ये मृत अवस्थेत आढळली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे (30, रा. कांजूरमार्ग, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसी 8 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरातून बाहेर पडली होती, पण ती रात्री घरी परतली नाही. तिचा फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या तपासात ती गोळवलीतील वीर लॉजमधील रूम नंबर 106 मध्ये असल्याचे निष्पन्न झाले. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी दरवाजा उघडला असता, मानसी मृतावस्थेत आढळली. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे.

मानसीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुमित हा विवाहित असून त्याने हे सत्य लपवून मानसीसोबत मैत्री केली होती. जेव्हा मानसीला तो विवाहित असल्याचे समजले, तेव्हा तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. परंतु, सुमितने तिचा पाठलाग सोडला नाही. तो इन्स्टाग्राम आणि अन्य माध्यमातून तिच्याशी संपर्क साधत असे. मानसीचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सतत मानसिक त्रास देत होता.

या त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.







