पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पाटील यांना सनदी दिली जाऊ शकते अशी माहिती आहे. रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मुंबईतील आठवडाभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली असून पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारीपदे वाटून दिली जाणार आहेत.
दरम्यान विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वासात घेऊनच फेरबदल होत असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.