यवत : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार असून यानिमित्ताने लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरवंड (ता. दौंड) येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची शनिवारी (ता. ४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगता सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार गट) पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar) यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असून त्यांच्यासमोर पवार कुटुंबीयातीलच सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वरवंड येथील बाजार मैदानावर सांगता सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वरवंड येथील शरद पवार यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सभेला दौंड तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित राहणार असून येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार व जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले यांनी सांगितले.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात खरी लढत सुप्रिया सुळे व भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्यात सरळ लढत होणार असली तरी ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत यांनी देखील प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
वरवंड येथील सभेत शरद पवार आपली काय भूमिका मांडणार व मतदानाचा कौल कसा आपल्या बाजूने फिरवतील हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. महायुती व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करणार का? सांगता सभेच्या माध्यमातून राजकीय वातावरण फिरवणार का? त्यामुळे या सभेकडे बारामती लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागले आहे.