दीपक खिलारे
इंदापूर : कोरोना काळामध्ये वाचन चळवळ खूपच कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात घडणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती मिळत नाही. तसेच चांगले विचार व चांगले ज्ञान मिळणे कमी झाले आहे. जागतिक स्तरावरील माहिती आपल्याला दैनंदिन वृत्तपत्र वाचनातून मिळत असते. त्यामुळे वाचन करणाऱ्यांना एक दिशा मिळत असते. म्हणूनच वाचन चळवळ वाचविणे, ही काळाची गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले.
इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा यांचा ५३ वा वाढदिवस नागरिकांनी विविध सामजिक उपक्रम राबवित साजरा केला.
इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील बस स्थानक व गणपती मंदिर येथे पेपर वाचन बॉक्स बसविण्यात आले. तसेच व्यंकटेशनगर येथील बालाजी मंदिर परिसर, गणपती मंदिर, सावतामाळीनगरमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, खडकपूरा येथील गणपती मंदिर, नेताजीनगर ४० फुटी रोड येथील महादेव मंदिरामध्ये, कसबा येथे पोरापोरांची चावडी, शुक्ल वाडा, श्रीराम मंदिर, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेनगर येथील अण्णाभाऊ साठे वाचनालयात व दत्तनगर येथील गणपती मंदिर पाण्याच्या टाकी जवळ, तसेच वडरगल्ली येथील क्रांतिसिंह मित्र मंडळाच्या गणपती मंदिरामध्ये पेपर वाचन पेट्या बसविण्यात आल्या व त्याचे लोकार्पण भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सरस्वतीनगर भागातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना साडीचोळीचे वाटप व माऊली बालक आश्रम व मूकबधिर शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोपट शिंदे, गजानन गवळी, अक्षय सूर्यवंशी, ललेंद्र शिंदे, सुनील अरगडे, बापू चव्हाण, जावेद शेख, अजिंक्य जावीर, सागर अरगडे, महेश कोकाटे, अख्तर कुरेशी, महाजन, प्रशांत उंबरे, अंगद शहा, शकील सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.