Sangli News : सांगली : आपले पद, प्रतिष्ठा बाजूला ठेऊन समाज भान राखून आजही अनेक शासकीय अधिकारी काम करतात. काही अधिकारी तर अगदी सामान्यांसारखेच जीवन जगत असतात. असाच एक अनुभव सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आला. निवडणूक आयोगाची मिटिंग आटोपून बाहेर येताच त्यांना एका व्यक्तीने ‘ओ साहेब…पोते उचलायला जरा हात लावता का?’ अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही मागचापुढचा विचार न करता मदत करण्याचा दृष्टीने एक नव्हे दोन नव्हे तर तीन कांद्याची पोती छोट्या कांदा विक्रेत्यास उचलून खांद्यावर दिली.
सूट बुटात असणारा हा व्यक्ती एक मोठा अधिकारी आहे हे त्या व्यापाऱ्यास माहित नाही आणि आपण ही पोती उचलून देत असताना आपण जिल्हाधिकारी आहे हे विसरून त्यांनी मदत केली. मात्र, हे क्षण चित्र त्यांचे मित्र उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी टिपले. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून बाहेर येताच त्यांना रस्त्यावर असलेल्या कांदा विक्रेत्याने अचानक ‘ओ साहेब, पोते उचलायला जरा हात लावता का?’ अशी विचारणा केल्याची हाक ऐकू आली.
जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी लगेच मागचा पुढचा विचार न करता त्यांनी तीन कांद्याची पोती उचलून डोक्यावर दिली. त्यांच्याबरोबर उपवनसंरक्षक राहुल पाटील काही अंतरावर होते त्यांनीही हे क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. सहकारी आपले चित्र टिपतायत याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांना नव्हती. तीन कांद्याची पोती उचलून देण्यासाठी मदत करत असताना राहुल पाटील यांना वाटले की, जिल्हाधिकारी दयानिधी यांचा एखादा फोटो काढावा आणि त्याचवेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले.
याबाबत आयएफएस अधिकारी राहुल पाटील यांनी लिहिले की, असे अधिकारी खरोखर एक वेगळी छाप पाडतात हे नक्की. फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही. खरंतर कांद्याची पोती उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याचवेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले.