S. Somnath Autobiography : चांद्रयान-३, आदित्य एल-१ आणि आता येऊ घातलेलं गगनयान. इस्रोच्या या सर्व भव्य-दिव्य मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा खडतर प्रवास आता जगासमोर आला आहे.
खडतर प्रवास जगासमोर…
सोमनाथ यांचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं आहे. सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिम्हांगल’ (चंद्रप्रकाश प्यायलेला सिंह) या शीर्षकाचे आत्मचरित्र मल्याळी भाषेत आहेत. हुशार, पण आत्मविश्वासाचा नसणाऱ्या युवकांना प्रेरित करण्यासाठीचा प्रयत्न या आत्मकथनातून केला आहे, असे सोमनाथ म्हणाले.
महाविद्यालयात शिकताना वाहतूक आणि वसतिगृहाचा खर्च वाचविण्यासाठी काटकसरीचे आयुष्य जगताना एका जुन्या सायकलची साथ त्यांना होती. अडचणींचा सामना करताना कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्यावर त्यांनी केलेल्या वाटचालीचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.
पुढील महिन्यात उपलब्ध होणार…
एस.सोमनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरली. याचे प्रतिबिंब या आत्मकथेत उमटले आहे. ‘चांद्रयान-३’नंतर लगेचच ‘आदित्य -एल१’ ही सौर मोहीम हाती घेण्यात आली तर गेल्याच आठवड्यात देशाची महत्त्वाकांक्षी मानवी अवकाश मोहिमेसाठी पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. या व्यग्रतेतूनही सोमनाथ यांनी त्यांचा जीवनाची कथा सांगण्यासाठी वेळ काढला आहे. हे पुस्तक केरळमधील लिपी पब्लिकेशन्सने प्रकाशित केले असून, नोव्हेंबर महिन्यात ते वाचकांच्या भेटीला येणार आहे.