अजित जगताप
सातारा : हिंगोलीचे जिल्हाधिकारी व बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदाचा अनुभव असलेले आय. ए. एस. अधिकारी रुचेश जयवंशी यांनी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांचे स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भली मोठी गर्दी झाली होती.
मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन जयवंशी यांचे स्वागत केले. नुतन सातारा जिल्हाधिकारी जयवंशी हे शास्त्री नगर, मेरठ, उत्तर प्रदेश येथील मूळचे रहिवाशी आहेत. राजकीय इंटर कॉलेज व आय आय टी शिक्षण घेताना त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्न केला. त्याला यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेचा चढता आलेख कायम ठेवला आहे. कॊरोना काळात त्यांनी रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. शंभर वर्षात एकदा साथीचे रोग पसरतात. ते देवाने काम करण्याची संधी उपलब्ध केली आहे. अशी त्यांची धारणा आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व माहिती घेतल्यानंतर ते आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रकल्पग्रस्त सामान्य जनतेचे पुनर्वसन, प्रस्तावित प्रकल्पाला गती प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न, सातारचे वैधकीय महाविद्यालय,औद्योगिक वसाहत विकास, अनधिकृत वाळू उपसा निर्बन्ध, आरोग्य व शिक्षण, बांधकाम विभागातील सुधारणा, पर्यटन स्थळे विकास, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगार युवकांना बँके मार्फत तातडीने कर्ज वितरण व महामंडळाच्या काही बोगस कर्ज वितरण झाल्याची चौकशी व अधिकऱ्यांकडून वसुली, शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊसाचे बिले अदा करण्यासाठी प्रयत्न, दलालांच्या मार्फत जिल्हा पातळीवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची काटेकोरपणे तपासणीचे आदेश, जलयुक्त शिवार अभियान, महावितरण, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, प्लास्टिक निर्मूलन, शासकीय कार्यालयातील अंधश्रद्धा निर्मूलन,महात्मा गांधी रोजगार हमी योजना, घरकुल अशा अनेक गोष्टीवर नुतन जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी यांनी लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील बिगर राजकीय लोकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महिन्यातून एक दिवस सामान्य जनतेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून जनता संवाद भेट घडवून आणावी अशी ही मागणी पुढे आली आहे.