पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नुकत्याच झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणानंतर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन चालकाने वेगाने गाडी चालवण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड कॉलेज वडगाव येथील आवारात ही घटना घडली असून याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड कॉलेजच्या आवारात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने रेंज रोव्हर गाडी भरधाव वेगाने चालवल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी त्याच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १९९ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार जर अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळली, तर पालक किंवा वाहनमालक यांना दोषी ठरवले जाते आणि त्यांना शिक्षा किंवा दंड भोगावा लागू शकतो.
आरोपी महेश बिडकर( वय 47)हे शिवसागर, सनसिटी येथे राहतात व त्यांचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिस ठाण्यात पोलीस नाईक सचिन घोरपडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाबुराव जायभाय यांनी दिलेली माहिती अशी की, घरातील पालक रुग्णालयात गेले असता 17 वर्षीय दोघा मुलांनी घरातून गाडीच्या किल्ल्या घेतल्या.त्यांना आम्ही समजावले असून त्यांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप देगाडे यांनी सांगितले, गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन असून त्याच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले होती.गाडीचा तपास घेतला असता ती गाडी त्यांच्या आजोबांच्या नावावर असल्याचे समोर आले. मात्र ती गाडी त्यांचे वडील महेश बिडकर वापरत असल्याचे समोर आलं