पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत मटण पार्टी करणं पुणे पोलिसांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. काही महिन्यापूर्वी सांगली कारागृहात घेऊन जात असताना हा प्रकार घडला होता. पार्टीची सगळी घटना ढाब्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुणे पोलिस आयुक्त यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यातूनही मटण पार्टी समोर आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोका अंतर्गत गजा मारणे सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.मात्र काही महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून त्याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येणार होते. गजा मारणे याला सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे त्याला घेऊन पोलीस व्हॅन सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सांगली कारागृहाकडे जात असताना रस्त्यात एका ढाब्यावर गजा मारणे यांना पोलिसांना मटणाचं जेवण दिलं.ही घटना धाब्याजवळील सीसीटीव्हीत कैद झाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तपासणी करण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यातून ही मटण पार्टी समोर आली. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
एखाद्या आरोपीला एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवत असताना पोलिसांना काही प्रोटोकॉल आणि नियम पाळावे लागतात. एका गुन्हेगारांसोबत धाब्यावर मटणावर ताव मारून पोलिसांनी हे नियम धाब्यावर बसवले का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
एका अधिकाऱ्यासह चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे.बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तवणूक असा ठपका ठेवत पोलिसासह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे गजा मारणेला ढाब्यावर भेटलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
गुंड गजा मारणे कोण आहे ?
गजानन उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजा मारणे ओळखला जातो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे यासह ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे आणि जिल्ह्यात त्याची दहशत आहे. २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. यापूर्वीही त्याच्यावर पाच वेळा मोक्का लावण्यात आला आहे. २०२२ मध्ये २० कोटींच्या खंडणीप्रकरणी त्याला अटक झाली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याने ३०० वाहनांसह मिरवणूक काढली होती, त्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता.