Nagar News अहमदनगर : गो ब्राम्हण प्रतिपालक “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! “जय भवानी…, जय शिवाजी, हर हर महादेव. एकाच सुरात अशी ललकारी होते.(Nagar News) वरवधू लग्नमुहर्तावर बहुल्यावर उभे राहातात. मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुरू होते. (Nagar News) जय भवानी…जय शिवाजी, हर हर महादेव ची गर्जना होताच तुतारी वाजवीत वरवधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. वऱ्हाडी मंडळी देखील टाळ्या वाजवीत या अनोख्या लग्नसमारंभाचे साक्षीदार ठरतात. मंगल वाद्यांनी सारा परीसर दुमदुमून जातो. ही गोष्ट एका लग्नाची…! (Nagar News)
मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार
लग्नसोहळा, विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. अहमदनगर येथील गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार पाडला. हिंदू स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांसमोर कायम स्मरणात राहावा. तसेच छत्रपती शिवरायांचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, या उद्देशाने थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळा पार पाडला.
विवाह सोहळा पार पडल्यानंतर विवाह सोहळ्यात विविध आर्केस्ट्रामध्ये गायली जाणारी चित्रपटाची गाणी न लावता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित पोवाडा तसेच स्फूर्ती गीते लावण्यात आली होती. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून तसेच स्फूर्ती गीते लावून होणारा विवाह सोहळा अहमदनगर शहरातच नाही तर जिल्ह्यातील हा पहिला विवाह सोहळा आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये आलेले मान्यवर पाहुणे यांचा सत्कार करणे हे नित्याचे ठरले आहे. परंतु थोरात कुटुंबीयांनी या सर्व सत्कारांना फाटा देत त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत करून तो पैसा शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना सुख सोयीसाठी दान करण्यात आला.
यातून शैक्षणिक संस्थांना दिलेला पैसा विद्यार्थी घडवण्यासाठी कामाला येईल. तसेच मंदिरांसाठी दान केलेला पैसा हा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी उपयोगी पडेल, या हेतूने हे दान करण्यात आले आहे. आज-काल लग्न म्हटले की डीजेच्या कर्कश आवाजावर वाजणारी गाणी आणि ऑर्केस्ट्रा तसेच इतर विविध प्रकारची मनोरंजनाची साधने लग्न कार्यामध्ये केली जातात. त्यातून ह्दयविकाराचे झटके येऊन काहिना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु थोरात यांनी अशा विवाह सोहळ्याला फाटा दिला आहे. आगळावेगळा आणि सर्व समाजापुढे आदर्श ठेवणारा असा शाही विवाह सोहळा अहमदनगर शहरांमध्ये पाहायला मिळाला.
मंगलाष्टका ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती गीते लावून लग्न लावण्यात आले. या विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडिया चांगलीच जोरदार चर्चा सुरू असून लग्नाच्या वेगळा पायंडा थोरात आणि धिसले परिवाराने पाडला आहे.
समाजातील इतर घटकांनीही थोरात आणि धिसले परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे विवाह सोहळा साजरे केल्याने होणारा अनावश्यक खर्चही टाळेल. तसेच समाजापुढे एक आदर्श घडून येणारी ही पिढी सुसंस्कृत आणि समाजकारणामध्ये चांगले काम करणारी घडेल. सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये जातीय राजकारण आणि भांडणं होत आहेत. ती भांडणे किंवा दंगे असे विवाह सोहळे पार पडल्याने कुठेतरी संपुष्टात येतील. असेही थोरात यांनी सांगितले.