Pune News : पुणे, ता.२३ : पहाटेची मंद हळुवार वाऱ्याची झुळूक, गर्द निळ्या आकाशपटलावर सुर्यकिरणाचा प्रभाव वाढू लागला होता. पुर्व क्षितीज उजळू लागल्याने पक्षांनी शिळ घालीत आसमंतात इतर पक्षी प्राण्यांना साद घालण्यास सुरवात केली होती. जलाशयाच्या काठावर पाणपक्षी पखं सावरत जागे झाल्याचे दर्शवित होते. प्रत्येकाचा मंजूळ आवाज त्यांच्या अस्थित्वाबाबत साक्ष देऊ लागला होता. उजनी धरणाच्या बॅक वाटरवर निस्तब्ध बसलेला मी… विविध प्रकारचे बदक, करकोचे, बगळे, रोहित पक्षी व इतर लहान लहान पक्षांना आपल्या दृष्टिक्षेपात आणत कुतूहलाने पहात होतो. हे लहान मोठे पक्षी देखील सहकाऱ्यांना सावधानेताचा इशारा देत दूरवर पसरलेल्या तांबड्या सुर्यकिरणात “जीवो जीवस्य जीवनंम” चा मंत्र म्हणत सकाळीच नास्त्या करत होती.
एक आगळा वेगळा क्षण
इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव नजीक उजनीच्या जलाशयाचे बॅक वाटर च्या जवळचा हा परिसर किती प्रसन्न होता. या परिसरातील दृष्य माझ्या नजरेसमोर असल्याने निसर्गातील आत्मिक समाधान लाभत होते.
दिवाळी संपत आली की हिवाळा सुरू होतो. मग आपोआपच माझी पाऊले जलाशय, नदी किनारी वळतात. या काळात पक्षांचे स्थलांतर झाल्याने जलाशयाच्या कडेला पक्षांची शाळा भरलेली पहावयास मिळते. सकाळ व संध्याकाळी या पक्षांची किलबिलाट निसर्ग सौंदर्यातील अदभुत सौंदर्य असल्या सारखे आहे. हिवाळा सुरू झाला की पक्षांना ऊब वाटेल, अन्न मिळेल अशा परिसरात येऊन ते वास्तव करताना दिसतात. वातावरणात होणारे स्थानिक बदल, हवेतील आर्द्रता, उपलब्ध अन्न, पूर वादळ व विणीची ओढ यामुळे पक्षी स्थलांतर करतात.
राज्यात नांदूर मधमेश्वर जलाशय, भीमा नदीचा उजनी जलाशय, नाथसागर या भागात पक्षांच्या सहवासात वेळ घालण्याचा प्रसंग आला. त्यामुळे तेथील पक्षांच्या वेगवेगळ्या जाती तसेच त्यांच्या हलचाली अनुभवता आल्या. भारतात नदी किनाऱ्यावर बहुतेक पाण पक्षांची असणारे वात्सव पहावयास मिळते. हे निसर्गातील सौंदर्य पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी पहाटेपासून जलाशया भोवती गर्दी करतात. हे निसर्गातील पाण पक्षी पाहण्यासाठी दृष्टी हवी असते.
जलाशयाच्या किनारी असणारी पाणवनस्पतीचा आधार घेत हे पक्षी आपली उपजीवीका भागवीत असतात. काही पक्षी या वनस्पतीजवळ विणीचा हंगाम घालवतात. नदी किनारी असणाऱ्या झाडांवर यांची घरटी करून प्रजनन करताना दिसतात. नर पक्षी मादीला शिळ घालत आकर्षीत करण्यात मग्न असतात. त्या काळात या निसर्गातील बदलणारे चित्र व त्यांचे असणारे वात्सव हे पर्यटकांना आकर्षीत करत असतात. या क्षणाचे छायाचित्रण व चलचित्र तयार करण्यासाठी अनेक पक्षी प्रेमी तासनतास जलाशय, नदी किनारी बसून असतात. एका सेंकदाच्या त्या छायाचित्रणाला लाख मोलाचा वेळ दिलेला असतो. पण त्या क्षणाचे चित्रण मिळाल्यावर त्या छायाचित्रकाराचे मन प्रसन्न होते. हा देखील या परिस्थितीला एक आगळा वेगळा क्षण असतो.
वेगवेगळ्या रंगाचे पक्षी, लांब, आखुड असणारी चोच, काहिंच्या डोक्यावर तुरा तर काहिंच्या मंजुळ आवाजाने त्यांची ओळख तर काहि लांब पायामुळे सहज ओळखले जातात. अशा पक्षांची निवासस्थाने नदी, सरोवर, जलाशय, तलाव या ठिकाणी पहावयास मिळतात. त्यामुळे या भागात पक्षांच्या स्थलांतराच्या काळात पर्यटक आकर्षीत होतात. त्या ठिकाणी गर्दी करताना दिसात. त्यामुळे या भागात पर्यटनासारखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो.
दरम्यान, जलाशय, नदीचे होणारे प्रदुषण, त्या बरोबर पक्षांची होणारी शिकार याचा परिणाम पक्षांवर झाला आहे. पर्यटनाच्या निमित्ताने जाणारे पर्यटक देखील वेगवेगळे अन्न पदार्थ प्लास्टिक च्या पिशवीत घेऊन जातात. त्या बरोबर पाण्याच्या बाटल्या देखील सोडून जातात. या ठिकाणी अस्वच्छता निर्माण करतात. त्यामुळे पक्षांची संख्या देखील कमी होत चालली आहे. काही प्रजाती लोप पावत आहेत. त्यासाठी सगळ्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने पक्षांच्या संवर्धनासाठी दक्ष राहण्याची गरज आहे.