लोणी काळभोर : किरकोळ भांडणावरून मोठ्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना उरुळी देवाची (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोंडेवस्ती परिसरात 19 जानेवारी 2020 साली रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी आज शुक्रवारी (ता.2) दिले आहेत.
निलेश बबन बोरकर (वय 27, रा कोंडेवस्ती उरुळी देवाची ता.हवेली जि पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मंगेश बबन बोरकर असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रत्नमाला बबन बोरकर (वय 48,) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिल्यानंतर घरामध्ये नेहमी वादविवाद होते. या वादविवादामधून त्यांची कडाक्याची भांडणे होत होती. 19 जानेवारी 2020 ला मंगेश घरी आल्यानंतर निलेश हा त्याला भांडणे करू नको. असे समजावून सांगत होता. त्यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. निलेश याने मंगेश याच्या डोक्यात दगडी पाटा घातला. मंगेश याच्या डोक्यातुन मोठा रक्त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नमाला बोरकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी निलेश बोरकर याला अटक केली होती.
सदर खुनाच्या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या खटल्यात फिर्यादी ही आरोपीची आई असल्याने फितुर झाली होती. तर आरोपीची पत्नी श्वेता ही प्रत्यक्षदर्शी घटनेची साक्षीदार होती. पण घटना घडल्यानंतर पोलिसांना श्वेता मिळुन आली नाही. त्यामुळे तिचे तपास टिपण नोंदवतात आले नव्हते. श्वेता ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने महिला पोलीस हवालदार ललिता कानवडे यांनी अथक प्रयत्न करून श्वेताचा शोध घेतला. त्यानंतर अॅड नामदेव तरळगटटी यांनी फौज प्रकिया संहीता 311 प्रमाणे अर्ज देऊन तिचा पुरावा नोंदवला. या खटल्यात महत्वाची तिची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व एक लाख रुपये दंड , दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील अॅड. नामदेव तरळगट्टी यांना लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व महिला पोलिस हवालदार ललिता सिताराम कानवडे यांची बहुमूल्य मदत मिळाली. पोलिस हवालदार ललिता कानवडे यांनी वेळेत सर्व पुरावे व साक्षीदार हजर केल्याने आरोपीला शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे कानवडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळत आहे.