मुंबई: लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भारतीय जनता पक्षाचे बळ आणखी वाढवलं आहे. तर, काँग्रेसला उत्तर भारतातून पूर्णपणे हद्दपार केलं आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ताबदल करत भाजपानं स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “चार राज्यांच्या निकालाचं विश्लेषण करण्यास अजूनही वेळ आहे. भाजपाचा विजय झाला, हे निश्चित आहे. पण, भाजपाच्या विजयाचे बारकावे निवडणूक आयोगानं संपूर्ण माहिती दिल्यानंतर करता येईल.”
आता या निकालानंतर तुम्ही इंडिया आघाडी किंवा काँग्रेसबरोबर जाण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही तर सुरुवातीपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छूक आहे. पण, आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही, हेही आम्हाला कळतंय. तरीही आम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास तयार आहोत.” असंही आंबेडकर म्हणाले.