पुणे : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सी-डॅक’च्या मदतीने प्रगत पर्जन्यमान व पूर अंदाज प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे आता हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक भाकीत वर्तवले जाणार आहे. ज्यामुळे पालिका प्रशासनाला त्वरित निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या या नव्या प्रणालीमुळे पाऊस व पुराचा अचूक अंदाज समजणार आहे.यामध्ये पावसाचे प्रमाण, पूर, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा या विविध समस्यांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने ‘मल्टि सेक्टोरियल सिम्युलेशन लॅब’ची उभारणी केली असून, हवामान, जल व्यवस्थापन, आरोग्य, वाहतूक या क्षेत्रांमधील घटक एकत्रितपणे समाविष्ट केले आहेत. आभासी प्रयोगांद्वारे त्यांच्या परिणामांवर अभ्यास केला जात आहे.
प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये :
प्रणालीच्या माध्यमातून ७२ तासांपूर्वीच भाकीत
हवामान, जलविज्ञान, वायू गुणवत्ता समावेश
स्वयंचलित पडताळणी व मूल्यांकन प्रणाली
धोरणकर्ते आणि नागरिकांना सुलभ माहिती
स्थानिक पातळीवर त्वरित निर्णयासाठी मदत
आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक