Pachgani News पाचगणी : डोंगर कपारीत वसलेल्या धावली या गावाला महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी भेट दिली. पाऊस पडत असल्याने गावावर दरडी कोसळून धोका पोहोचू नये म्हणून विविध सूचना ग्रामस्थांना दिल्या. (Pachgani News)
दोन वर्षांपूर्वीच्या मुसळधार पावसाने धावली गावच्या वरच्या बाजूला सुमारे ५०० फूट उंच डोंगरकडा आहे आणि त्याच्यावर तीव्र उतार असलेला सुमारे २५० फूट उंच डोंगरकडा आहे. या दोन्ही डोंगरकड्याच्या मधल्या भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊ लागल्याने प्रचंड प्रमाणावर दरड आणि माती खाली वसलेल्या धावली गावावर कोसळत होती.
त्यातच गावच्या खालच्या बाजूला असणाऱ्या डोंगर भागाकडे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडू लागल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत होते. त्यावेळी गावाला स्थलांतरित होऊन शाळेत आसरा घ्यावा लागला होता. तर ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी शासन दरबारी मागणी केली होती. मात्र, अद्यापही फाईल पुढे सरकत नाहीत.
रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर तालुक्याचा महसूल विभागही सतर्क झाला असून, आज तहसीलदार तेजस्विनी पाटील व त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी धावली गाठली आणि गावाच्या डोक्यावर टांगती तलवार बनून राहिलेला कडा व डोंगराची तसेच खालच्या बाजूस असणाऱ्या भेगा यांची पाहणी केली. आणि ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी मंदिर आणि शाळेत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, संभाव्य धोका पाहून तहसीलदारांची ही भेट होती. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या सांगितल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.