लहू चव्हाण
पाचगणी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत दांडेघर ते महाबळेश्वर मुख्य मार्गाच्या दुतर्फा पडणारा कचरा गोळा करण्याची रस्त्यालगत असणाऱ्या खातेदारांना कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला. गोडा यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन या योजनेचा शुभारंभ केला.
ग्रामपंचायत भोसे आणि पांगारी आणि हिलदरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी – पाटील गट विकास अधिकारी अरुण मरभळ, मंडल अधिकारी विजय ढगे,ग्रामसेवक आर व्ही चव्हाण, तलाठी निलेश गीते, दीपक पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन नगरी पाचगणी -महाबळेश्वर या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूला दांडेघर, भोसे, व पांगारी दरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, हे कचऱ्याचे ढीग हटवून कचरामुक्त रस्त्यासाठी भोसे आणि पांगारी ग्रामपंचायती कार्यरत असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.याचाच एक भाग म्हणून अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ग्रामपंचायत पांगारी व भोसे ग्रामस्थांशी संवाद साधून श्रमदानाबरोबर विविध कार्यक्रम या कालावधीत आयोजित करणेबाबत चर्चा केली व सूचना दिल्या .
दरम्यान, या स्वच्छ्ता मोहिमेत प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी वन व्यवस्थापन समितीचे वनअधिकारी,भोसे, पांगारी सरपंच सदस्य, ग्रामस्थ व मान्यवर सहभागी झाले होते.