अजित जगताप
सातारा : वडूज नगरीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालक व प्रवाश्यांना हेलकावे खावे लागतात. याचा अनुभव घेणाऱ्या वडूजकरांना सुखद धक्का दिला आहे. वडूज अंतर्गत रस्त्यातील खड्डे बुजवून श्रावणी सोमवार पूर्वसंध्येला वडूज मध्ये भाविकांना ठेकेदार श्री अक्षय थोरवे व त्यांच्या सहकारी यांनी अनोखी भेट दिली आहे.
गेल्या आठवड्यात वडूज परिसरात पावसाने हजेरी लावून अनेकांची हैराण केले होते. रस्त्यावरच पाण्याची डबकी तयार होऊन डास-मच्छर यांची भली मोठी वसाहत निर्माण झाली होती. काहींना साथीच्या रोगाने पिछाडले होते. यातून नगरसेवक सुध्दा सुटले नव्हते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडूज शहराध्यक्ष व युवा नेते अक्षय थोरवे यांनी वडूज नगरपंचायत हद्दीत मुरूम टाकण्याचे काम स्विकारुन रीतसर स्वामित्व चलन भरले.गेली आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यानंतर स्वतः उभे राहून रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
वडूज नगरीतील कर्मवीर नगर व इतर प्रभागात आतापर्यंत तिनशे ब्रास मुरूम टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू झाल्याने अनेक पालक वर्ग लहान मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी अंतर्गत रस्त्याचा वापर करतात. आज भर उन्हात उभे राहून श्री थोरवे यांनी जिसिबी वाहन चालकांना सूचना करीत रस्त्यावर व्यवस्थितरित्या मुरूम टाकण्याचे काम केल्याबद्दल त्यांना अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान, या कामांसाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच सन्मानीय सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि वडूज नगरपंचायत कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले आहे.उद्या या वर्षाचा पहिला श्रावण सोमवार असल्याने खास भाविकांसाठी रस्ता दुरुस्तीचे काम केल्याने अनेकांना सुखद धक्का बसला आहे