नारायणगाव, (पुणे) : घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरून नेत असताना विरोध करणाऱ्या मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील सुलोचना टेमगिरे (७० वर्ष) वृध्द महिलेचा धारदार शास्त्राने वार करून खून करणाऱ्या पती-पत्नीला ४८ तासांत अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून दोन्ही आरोपींना अहमदनगर एस.टी. स्टैंड परीसरातून अटक केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे.
शिवम उर्फ संकेत श्रीमंत (वय – २१) व त्याची पत्नी पूनम श्रीमंत (वय – २०, रा. दोघेही गजानन नगर, ता. चिखली जि. बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना टेमगिरे यांच्या पतीचे व एका मुलाचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्या दुसऱ्या मुलासोबत घनवट मळा येथील शेतात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा हा पुणे या ठिकाणी नोकरीला आहे. सोमवारी (ता. १२) एकटया घरी असताना अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारदार शास्त्राने वार करून त्यांचा खून केला. तसेच घरातील कपाट उचकटलेले व कपडे अस्ताव्यस्त होते. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा नारायणगाव पोलीस तपास करीत असताना तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, खोडद परीसरात शेत मजुरीसाठी वाशिम जिल्हयातील एक पती-पत्नीचे जोडपे आले होते. ते जोडपे अचानक आठ दिवसांपूर्वी निघुन गेले होते. परंतु ते पती-पत्नी गुन्हा घडलेल्या धनवट मळा परीसरात घटनेच्या दिवशी दिसून आले होते.
दरम्यान, गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी संशयित जोडप्याची माहिती मिळवून त्यांना अहमदनगर एस.टी. स्टैंड परीसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. तसेच सोन्याचे दागिने चोरून नेहले याबाबत चौकशी सुरु आहे. दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सनील धनवे, जगदेवाप्पा पाटील, विनोद धुर्वे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी केली आहे.