पुणे : राज्यभरातील ११ लोकसभा मतदार संघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदासंघाचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील लोकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे.
या निवडणुकीत विरोधात असलेले अनेक पक्ष एकत्र असल्याने उमेदवाराचे चिन्ह शोधताना मतदारांची दमछाक होताना दिसत आहे. अशातच आता एका आजोबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ईव्हीएम मशिनवर कमळ चिन्हचं दिसत नसल्याने मतदानासाठी आलेले आजोबा चांगलेच संतापल्याचा प्रकार पुण्यातील धायरी येथील काका चव्हाण शाळेत घडला आहे.
नेमकं काय घडलं?
बारामती लोकसभेत यावेळी महायुती आणि महाविकासआघाडी अशी थेट लढत आहे. महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेञा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत. धायरीतील काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर एक आजोबा मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं चिन्हं घड्याळ असल्याने आजोबांना इथे भाजपचं चिन्हच दिसलं नाही. त्यामुळे आजोबा चांगलेच संतापले.
घड्याळ चिन्हामुळे तिथं यावेळी कमळ हे चिन्ह दिसत नव्हतं. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळत आहे. बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.