हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत मागील काही दिवसापासून नवीन मुळा मुठा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. हे अस्तरीकरणाचे काम करण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, येथील नागरिकांनी हे काम बंद करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे काही ग्रामपंचायतींनी निवेदन देखील दिले आहे.
पूर्व हवेलीतीळ दोन कालव्याच्या पाण्यावर दहा वर्षांपूर्वी रोपवाटिकांचा उद्योग सूरु झाले होते. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेला हा व्यवसाय पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, आळंदी म्हातोबाचीसह इतर ही ठिकाणी हा व्यवसाय सुरु आहे. याची अल्पावधीत उलाढाल कोटींच्या घरात गेली असून यावर अनेक कुटुंबाचा उदर्निवाह चालतो.
मागील काही दिवसापूर्वी कालव्यात प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणत पाणी झाल्याने पाणी काही गावात शिरले होते. या शिरलेल्या पाण्याच्या अनुशंघाने पाटबंधारे विभागाकडून सदर कालव्याची साफसफाई करण्यात आली. तसेच कालवा स्वच्छ करण्यात आला. मात्र या कालव्याची साफसफाई झाल्यानंतर कालव्याचे सिमेंटच्या माध्यमातून अस्तरीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायिकांना व शेतकऱ्यांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पूर्व हवेलीतूनच महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात रोपे पाठवली जातात. शेतीला जोडधंदा म्हणून पूर्व हवेलीतील सुमारे पाचशे शेतकऱी पुत्रांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून नर्सरी उद्योग सुरू केला आहे.
दरम्यान, अस्तरीकरणामुळे पाझर तलाव, कुपनलिका, विहरी हे बंद होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतीनी अस्तारिकरणाला विरोध दर्शवला आहे. हे काम न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी म्हणाल्या, सोरतापवाडी गावातील नर्सरी व्यवसाय व शेती व्यवसाय हा पूर्णपणे मुळा मुठा कालव्यावर व बेबी कालव्यावर अवलंबून आहे. जर अस्तरीकरण झाले तर दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या विहरी, कुपनलिका, या भविष्यात कोरड्या पडतील. त्यामुळे सोरतापवाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभा घेऊन संपूर्ण नागरिकांनी या अस्तरीकरणाला विरोध दर्शवला आहे.
यबाबत कोरेगाव मूळ येथील नर्सरी व्यावसायीक दिलीप शितोळे म्हणाले, “मागील अनेक दिवसापासून खडकवासला धरणातून इंदापूर या ठिकाणी पाणी जाते. या दिवसात या विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी गळती दिसून आले नाही का? जर इतके वर्ष कधी पाणी गळती झाली नाही का? आमच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक व शेतकर्यांच्या विहरी आहेत. अस्तारीकरण केले तर पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीना याच कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नवीन कालव्याचे पाणी जुन्या बेबी कालव्याला पाणी सोडावे.
याबाबत कुंजीरवाडी येथील शिरुर हवेलीचे शिवसेना संघटक स्वप्नील कुंजीर म्हणाले, “लोकवस्तीत अस्तरीकरण करण्यास आमचा विरोध नाही. कालव्याचे पूर्ण अस्तिरीकरण केले तर शेतकरी व लघुउद्योग यांना मोठा फटका बसेल भविष्यात पाणी टंचाई प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे फक्त लोकवस्ती पुरते अस्तरिकरण करावे व बाक़ी इतर ठिकानी कालवा जैसे थे खुला वाहत ठेवावा. पूर्ण अस्तरीकरनास शिवसेनेचा तीव्र विरोध राहिल.