अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील वडूज नगरीत रामायण कालीन तारकेश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात येरळा नदी किनारी शेतावरील बांधावर असलेल्या विधुत खांबांवर मीटर बॉक्स आहे. त्या मध्ये अडकून पडलेल्या एका अति विषारी चार फूट लांबीच्या सापाला मोठ्या शिताफीने पकडून जीवदान देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे भाविकांनी आरती व पूजा करण्यासाठी तारकेश्वर मंदिरात प्रवेश केला होता. ढगाळ वातावरणामुळे अंधार पडल्याने एका भक्तांनी सेवेकरी निलेश कणसे व सुशांत पार्लेकर यांना मंदिरात विधुत प्रवाह सुरू करण्यासाठी त्या खांबांवरील मीटर बॉक्स उघडून ते चालू करण्याची सूचना केली. त्यानुसार त्या दोघांनी बॉक्स उघडला असता एक मोठी रस्सी असल्याचा भास झाला. ती बाजूला करण्यासाठी त्यांनी हात लावताच सापाने तोंड बाहेर काढले. या अचानकपणे घडलेल्या प्रसंगाने गारठ्यात ही दोघांना घाम फुटला.
त्यानंतर संपूर्ण मीटर बॉक्स उघडला.सापाने शिकार करून सरपटणारा लहानसा प्राणी गिळला होता. त्यामुळे त्या सापाला मीटरच्या होलातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. सुमारे दोन तास शिवसेना वडूज शहरप्रमुख सुशांत पार्लेकर व पत्रकार निलेश कणसे, अभिजित गायकवाड, सुधीर गोडसे यांनी अथक परिश्रम घेतले. सापाला जिवंत बाहेर काढण्यासाठी एकाने शेपटी तर दुसऱ्याने तोंड धरले होते. त्यांचे हात अवघडून गेले होते.
यावेळी पत्रकार अजित जगताप, मुन्ना मुल्ला हे सुध्दा मदतीसाठी सरसावले. पण, सापाचे उग्र रूप पाहून सर्वजण भयभीत झाले होते.अखेर जीवाची पर्वा न करता श्री पार्लेकर व श्री कणसे यांनी श्री तारकेश्वर देवाचे नाव घेऊन धाडस केले. त्यानंतर अडकलेल्या सापाला बाहेर काढून पुलाच्या पलीकडे सोडण्यात आले. सापाने त्वरित तिथून पुढे जाऊन पळ काढला. याठिकाणी लहान मुले तसेच शेतकरी व कामगार यांची वर्दळ असते. यावेळी बघ्याची गर्दी झाली असली तरी कोणीही पुढे येण्याचे धाडस करीत नव्हते.
दरम्यान, वीज पुरवठा सुरू करण्याची सूचना देण्यात आल्याने सेवेकरी त्याठिकाणी गेले होते. अन्यथा इतरांना सापाने दंश केला असता तर मोठा बाका प्रसंग आला असता. पावसाळ्यात निवाऱ्यासाठी साप व इतर सरपटणारे प्राणी मीटर बॉक्स चा आधार घेत आहेत. अशा वेळी सावधगिरीने बॉक्स उघडून मोटर अथवा वीज पुरवठा चालू करावा अशी सूचना पत्रकार निलेश कणसे यांनी केली आहे.