-युनूस तांबोळी
शिरुर : आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तो आपल्या समोर आहे. हा निकाल आपल्याला अपेक्षित लागलेला नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत आंबेगाव व शिरूर मधून ६० हजार च्या मताधिक्याने जिंकलो होतो. मात्र या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातून ५७९९ मताधिक्य तर शिरूर तालुक्यातून ४१३८ मताने मागे राहिलो. मताधिक्य कमी झाले, या नाराजीच्या भावनेतून कार्यकर्ते कुंजबलेले आहेत. पण ही नाराजीची भावना काढून टाका.
अखेर आपण विधानसभा निवडणूक जिंकलो. कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून या निवडणुकीत ज्या गोष्टी चुकल्या त्यांनी त्या दुरूस्त कराव्या. भविष्यातील जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या कामाचे सर्वेक्षण करून तिकीट दिले जाणार. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आजपासूनच मतदार संघात कामाला लागा, असे आवाहन आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर ( ता. आंबेगाव ) येथे महायुतीतर्फे शनिवार ( ता. २१ ) झालेल्या आभार मेळाव्यात वळसे पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सहकारी बॅकेच अध्यक्ष देवेद्र शहा, किरण वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे, राजेंद्र गावडे, जयश्री पलांडे, विवेक वळसे पाटील, प्रदिप वळसे पाटील, संदिप बाणखिले, प्रकाश पवार, विष्णू हिंगे, जयसिंग एरंडे, अरूण गिरे, सुनिल बाणखिले, दत्ता थोरात, सदाआण्णा पवार, बाबाजी निचित, मुकूंद नरवडे, विलास थोरात, आंबेगाव व शिरूर मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, मतदारांनी महायुतीतील २३२ उमेदवार तर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील ४१ उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी केले. आपन भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे अनेक गटतट निर्माण झाले. वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे त्याचा थेट परिणाम मतावर झाला. आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुकीत आपल्या बरोबर राहून ज्यांनी समोरच्या उमेदवारांचे काम केले. हे सर्व मला माहित आहे. यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याचे कामाचे मुल्यमापन केले जाईल. इतर तालुक्यात साखर कारखाना, बाजार समिती व इतर संस्थेच्या निवडणुकीत कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. मात्र आंबेगाव तालुक्यात या निवडणुकीसाठी एक रूपया देखील खर्च करावे लागत नाही. असे असताना देखील संचालक मंडळी गायब असतात. गावांना विकासाची कामे देऊन देखील मताधिक्य नाही ही खरी चिंतनाची बाब आहे. यापुढे गावागावातील गोरगरीब, अदिवासी महिला व पुरूषांशी संपर्क करून त्यांची विकासाची कामे करा. निवडणुकीत मदत केलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.
मनातील खंत…
गेल्या ३५ वर्षाच्या कालावधीत सात वेळा आमदार होऊन वेगवेगळी मंत्री पद भुषविली. राज्यातील समस्या जाणून घेऊन त्यांचा अभ्यास करत सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत विकासाची कामे आणून आर्थिक प्रगती केली. राज्यभर काम करत असताना विरोधकांसाठी मागचे रान मोकळे होते. मी आजारी नाही. छोट्याशा अपघातामुळे जनतेचा संपर्क तुटला. मी आजारी असल्याचा सोशल मिडीयावर गाजावाजा झाला. जनतेच्या संपर्कासाठी उद्योग, व्यवसाय व इतर पारंपारीक कामांमुळे जवळच्या माणसांना वेळ मिळाला नाही हे खरे आहे. पण मी प्रामाणिकपणे जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झगडलो. मग या निवडणुकीत बदल हवा असे का बोलले जात होते हे मात्र मला कळाले नाही. अशी खंत वळसे पाटील यांनी व्यक्त केली.