Mit News : लोणी काळभोर, (पुणे) : आज देशातील युवकांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तसेच आपले आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सायकलिंग अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुरज भोयर यांनी केले. Mit News
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयाने ‘नशामुक्त भारत अभियाना’ अंतर्गत शनिवारी (ता. २२) कॅम्पसपासून ते ऐतिहासिक मल्हारगडापर्यंत प्रा. डॉ. सुरज भोयर यांच्या नेतृत्वात सायकलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुरज भोयर बोलत होते.
यापुढे बोलताना डॉ. सुरज भोयर म्हणाले, “दुसरीकडे आपला ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वास्तुंविषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त व्हावी, यासाठी या सायकलिंग व मल्हारगडावर ट्रेकिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील पहिले पोलीस उप निरीक्षक ज्यांनी एवरेस्ट शिखर सर केलेले शिवाजी ननावरे यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ननावरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांना नशामुक्ती व सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली.
अधून-मधून रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरींचा आणि दिवे घाटातील मनमोहक दृश्यांचा आनंद घेत डॉ. भोयर यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी हे पुण्यातून सायकलने मल्हारगडाकडे निघाले. दिवेघाटाची कठीण चढाई होती, परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या वातावरणातील आल्हाददायकतेने सर्वांमध्येच अनोखा उत्साह संचारला होता.
एमआयटी-एडीटी विद्यापीठ कॅम्पस ते मल्हारगडापर्यंत व तेथून परत असा ५५ किलोमीटरचा हा सायकलिंग उपक्रम होता.
मल्हारगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्व जण ट्रेकिंग करत गडावर पोहोचले. गडावर पोहोचल्यानंतर दूरवर पसरलेली हिरवाई पाहून आणि रिमझम पावसाच्या वर्षावाने सर्वांचाच थकवा नाहीसा झाला.
दरम्यान, या वेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींच्या कार्याला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी या वेळी मल्हारगड व परिसरात स्वच्छताही केली. Mit News