छत्रपती संभाजीनगर : आपल्या राज्यातच नव्हे तर देशभरात मागण्यासाठी विरोधक सरकारच्या विरोधात सतत वेगवेगळी आंदोलने करत असल्याचे आपण पाहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहे. त्यातच आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक रंजक चित्र पाहायला मिळत आहे. शहरात चक्क मंत्र्याच्या मुलानेच आपल्या वडिलांच्या सरकार विरोधात मोठा मोर्चा काढला आहे. (Drought)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत सरकार विरोधात धडक मोर्चा काढला आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याला सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आज १२ वाजण्याच्या सुमारास सुरवात केली आहे. (Minister Abdul Sattar)
अब्दुल समीर यांनी या मोर्च्याची मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. सिल्लोड तालुक्यातील महसूल मंडळ आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते. त्यामुळे आजच्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.(Eknath shinde )
सिल्लोड तालुक्यातील या मोर्च्याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. आता या बाप-लेकाच्या मोर्च्यामुळे सरकार आणि सरकारमधील एक मंत्री चांगलेच चर्चेत आले आहेत. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याची सुरवात झाली. सिल्लोड तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका घोषित करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघालेला हा मोर्चा तहसिल कार्यालयावर जाऊन धडकणार असल्याची माहिती आहे.
राज्यात एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असून अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. सरकारमधील प्रचंड विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवली. मात्र, आता त्याच अब्दुल सत्तार यांच्या मुलावर सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. सरकारने दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून सिल्लोड तालुका वगळल्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे अब्दुल सत्तार यांच्या मुलाने थेट आपल्याच सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे.(Minister Abdul Sattar)