Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. सोमवारपासून म्हणजेच कालपासून बीड, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये जाळपोळीचे सत्र सुरू झाले आहे. एकीकडे याचे खापर मराठा आरक्षण आंदोलकांवर फोडले जात आहे. तर, दुसरीकडे जरांगे पाटलांकडून हे आरोप फेटाळले जात आहेत. तर काही राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली.
महत्त्वाची अधिसूचना जारी होण्याची शक्यता
इंटरनेट सेवा, संचारबंदीचे आदेश : बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यासोबतच संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. तर पंढरपूरमध्ये मंगळवारी सकाळी एसटी बसला आग लावण्यात आली. या घडामोडींमुळे राज्यातील मराठा आमदार धास्तावले आहेत. त्यामुळेच आज 31 ऑक्टोबरला मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. सकाळी ११ वाजताच्या आसपास बैठक होणार आहे. बैठकीचे ठिकाणी गुप्त आहे. या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा करुन रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. या नंतर सर्वपक्षीय मराठा आमदारांकडून आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणला जाऊ शकतो. आतापर्यंत शिंदे गटाच्या हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील या 2 खासदारांनी राजीनामे दिले आहेत.
कुणबी प्रमाणपत्र : आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यात कुणबी प्रमाणपत्रांसाठी नेमण्यात आलेल्या शिंदे समितीचा अहवाल सादर केला जाईल. अहवालातील मुद्द्यांना अनुसरुन कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महत्त्वाची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
विशेष अधिवेशनाची मागणी : मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. हे विशेष अधिवेशन तीन ते पाच दिवस असू शकते. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल बैस यांची भेट घेतली. विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. मराठा, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. त्यातच अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी संकटात आहे. या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी मविआकडून करण्यात आली. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, राजेश टोपे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान शिवसेना आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित होते.