पुणे : पुण्यातील सिंचन भवन येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत कृष्णा खोरे स्वायत्त करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत .यासाठी वित्तीय सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. उपलब्ध साधनांचा वापर करून महामंडळ स्वायत्त करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहता कामा नये, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या दृष्टीने महामंडळाचे काम झाले नाही. त्यामुळे महामंडळे स्वतंत्रपणे कार्यरत व्हावीत असा उद्देश आहे. सरकारकडून मिळणारा निधी कमी स्वरूपाचा आहे. त्या निधीवर भागणार नाही. महामंडळ स्थापन करताना निधी उभा करण्यासाठी जे अधिकार दिले त्याचा वापर केला जाईल असे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान महामंडळ स्वायत्त करण्यासाठी वित्तीय सल्लागार नेमण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वित्तीय सल्लागाराच्या पॅनेलपैकी एकाची नियुक्ती करण्यात येणार आहे,’ अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.
या बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता (प्रकल्प) हनुमंत धुमाळ आदी उपस्थित होते.